सुहास

संगणकामुळे बऱ्याचजणांचे आयुष्य बदलले. चांगले - वाईट परिणाम झाले. त्याचे एक उदाहरण. बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यांमुळे काही तांत्रिक शब्द आठवत नाहीत.

 नोकरीला दोन-तीन महिने झाले होते. एका रविवारी सुहास घरी आला. मी नोकरीला लागल्याबद्दल माझे अभिनंदन केले. नोकरीसंदर्भात चौकशी केली.

थोडावेळ शांत बसल्यावर हसून म्हणाला "या कॉम्प्युटरने माझं खूप नुकसान केलंय. जवळ-जवळ आयुष्य उद्ध्वस्त केलंय म्हटलं तरी चालेल. त्यावेळेस कॉलेजमध्ये होतो, वेळ होता म्हणून टायपिंगचा क्लास लावला होता. क्लासमध्ये सरांशी ओळख वाढली. त्या क्लासमध्ये टाईपरायटर दुरुस्तीची कामे केली जात होती. नंतर कळलं की त्यांचं बऱ्याच मोठं-मोठ्या कंपन्यांबरोबर दुरुस्ती आणि देखभालीच काँट्रॅक्ट आहे. बऱ्यापैकी पैसा होता. या क्षेत्रात खूप कमी माणसं होती. म्हणून या क्षेत्रात झोकून द्यायचं ठरवलं.

कॉलेज करून नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी करून कॉलेज करायचं ठरवलं. घरच्यांचा विरोध होता, पण माझ्यापुढे त्याचं काही चाललं नाही. पास होण्यापुरते मार्क मिळवायचे आणि मन लावून काम करायचो. काम खूप होतं, त्यामानाने पगार खूपच कमी होता. मला पगाराची काही पर्वा नव्हती. आपण याला शिकवून उपकार करतोय असं सरांना वाटत होतं.

कॉलेज पूर्णं झालं की स्वतःची छोटीशी कंपनी टाकायची ठरवले होते. जिथे दुरुस्तीच काम करायचो तिथं ओळखी वाढवून ठेवल्या होत्या. पुढे उपयोगी पडतील म्हणून. कॉलेज फक्त नावाला होतं. परीक्षेच्या १०-१५ दिवस आधी सुट्टी घेऊन अभ्यास करायचा आणि पास होण्यापुरते मार्क मिळावयाचे हे ठरलेलं.

कॉलेज संपलं आणि त्याच वेळेस भारतात संगणक युग अवतरलं. जिथे शेकड्यांनी टाइपरायटर्स दिवसभर चालायचे तिथे कॉम्प्युटरमुळे मिनिटात कामे होवू लागली. मी मात्र… म्हणजे वेड लागायची पाळी आली…कारण पुढचं भविष्य दिसू लागलं होतं. आज नाही पण वर्षभरात माझं काम पूर्णपणे बंद होणार होतं. ज्याच्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. हात जाळून घेतले** त्याचा काहीही उपयोग होणार नव्हता.

परीक्षेत किती मार्क मिळणार ते मला माहीत होते. त्याच वेळेस घरी अशी परिस्थिती निर्माण झाली की घराचा सारा भार माझ्यावर आला. म्हणजे आता मिळेल ती नोकरी करून माझे आणि घरच्यांचे पोट मला भरायचे होते.

मनाने इतका खचलो की विचारू नको, कॉम्पुटर म्हटलं की उगाच एक दडपण येतं मला."

त्यावेळेस सुहास Door To Door Marketing करत होता.

——————

**अक्षर पुसट आली किंवा खराब झाली की ते अक्षर बदलावं लागत. त्यासाठी ते तापवून जोड द्यावी लागते. किंवा असच काहीतरी नीटस आठवत नाही.

1 Comment »

The URI to TrackBack this entry is: http://gadhav.blogsome.com/2006/08/21/p16/trackback/

  1. humm…pregaticha dushparinam. Engrajanchya rajyat hatmag band padale tasach hehi.

    Comment by abhijit — August 25, 2006, 6:55 pm @ 6:55 pm

RSS feed for comments on this post.

Leave a comment

Line and paragraph breaks automatic, e-mail address never displayed, HTML allowed: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <code> <em> <i> <strike> <strong>



Anti-spam measure: please retype the above text into the box provided.