मी आणि गाढवं - १

प्रसादने माझ्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न केला. 
म्हणाला "ताजमहाल म्हणजे पूर्वीचे शिवमंदिर, आणि बांधणारे कोण? हिंदूच.
त्यांनी अशी मेख केली की घुमटाला एक छिद्र ठेवले ज्यामुळे सूर्याचा प्रकाश थेट मुमताजच्या थडग्यावर पडेल, कारण थडग्याच्या खाली शंकराची पिंड आहे."
मला माझे अज्ञान लपवता आले नाही.

माझ्या ज्ञानात भर टाकावी या हेतूने त्याने "हज" यात्रा आणि हिंदू धर्म यांचा असलेला संबंध मला सांगितला.
"हज यात्रेला जाणारे सैतानाला दगड मारण्याचे पवित्र कार्य करतात म्हणजे नक्की काय करतात?
बरं तीथं पाणी घेऊन जायला बंदी आहे.
तुझ्याकडे पाणी सापडले की तुला तुरुंगात टाकले समजा!
कशासाठी एव्हढं सगळं माहीत आहे का"?

"नाही बुवा, मला यातलं काहीच माहीत नाही."

"अरे तिथे पूर्वी जागृत शिवलिंग होते. पण हि लोक त्याला सैतान म्हणून दगड मारतात आणि पाण्याचा एक थेंबदेखील घेऊन जायला मनाई करतात.
त्यांनी तिथं बांधकाम केलं आहे त्यात हे शिवलिंग गाडून टंकलंय."

मी फक्त गाढवासारखी मान हलवली.

गाढव आणि मी

चाकोरीबद्ध जीवन जगणारा. शाळा, कॉलेज, नोकरी, लग्न….. अस ठरवून दिलेलं आयुष्य, ठरलेल्याच मार्गाने जगणारा…. मी.

एक सीमित, साचेबद्ध आयुष्य एका रेखीव चौकटीत जगताना बाहेरच्या जगाची कसलीही तमा बाळगत नाही. बाहेरच जग देखील मी मला हवं तसं चाकोरीबद्ध केलंय. माझ्या आजूबाजूची माणसं, नातेवाईक आणि जगाबद्दल असलेलं माझं पुस्तकी ज्ञान याच्या जोरावर मी माझ्या गाढव-बढाया मारणार आहे.

मला माहीत असलेल्या प्रत्येक गोष्टींबद्दल मी गाढववाणीने (अधिकारवाणी सारखीच किंवा त्यापेक्षा प्रगल्भ अशी ही वाणी आहे) मी गाढवमते इथे मांडणार आहे. ती माहिती ऐकीव असेल, अपूर्ण असेल तरीही मी गाढववाणीने माझी मते मांडणार.
माझ्या प्रत्येक मताशी मी सहमत असेलच असे नाही, ती गाढव अपेक्षा ठेवू नका.

सध्या लिहिण्यासारखं काही नसल्यामुळे वाचनाच काम करतोय. ब्लॉग लिहिण्यासाठी याचा फार फायदा होतो.

नवीन ब्लॉग लिहिणाऱ्यांना गाढवसल्ला - शक्य ते वाचा त्यामुळे तुम्हाला लिहिताना विचार करण्याची गरज पडत नाही, दोन चार ओळी इकडून - तिकडून आपल्या ब्लॉग मध्ये आपल्या नावाने खपवता येतात. चांगल्या ब्लॉगमधून चांगल्या गोष्टी घेतल्या की उत्कृष्ट ब्लॉग म्हणून तुमचे नाव झाले समजा.

गाढव

बेतून दिलेले आयुष्य

बेतून दिलेले आयुष्य; जन्मलो तेंव्हा
प्रकाशही तसाच बेतलेला
बेतलेलेच बोलणे बोललो. कुरकुरत
बेतलेल्याच रस्त्याने चाललो; परतलो
बेतल्या खोलीत; बेतलेलेच जगलो
म्हणतात! बेतलेल्या रस्त्याने गेलो तर
स्वर्ग मिळेल. बेतलेल्याच चार खांबात
थूः

- नारायण सुर्वे

इतरांनी ब्लॉग लिहिला म्हणून आपणही लिहावा या गाढवविचारातून जन्माला आलेला हा गाढवब्लॉग.

ब्लॉग का सुरू केला? कशासाठी? फायदा काय? असे कोणतेही प्रश्न मनात आले नाही किंवा त्यांची उत्तरे माझ्याकडे नाहीत.

मी फक्त इतरांचं अनुकरण केलं. इतरांनी ब्लॉग लिहिला म्हणून…..